कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने यावर्षीच्या वार्षिक अहवालात चुकीची माहिती प्रसिद्ध केली आहे. कारखान्याचे जमीन वाढीव मूल्यांकन निधी रु. २७ कोटीवरून रु. १७९ कोटी दाखविले आहे. हे वाढीव मूल्यांकन दिशाभूल करणारे आहे. याचा खुलासा करावा, अशी मागणी विरोधी गटाने प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी, प्रा. सुनील शिंत्रे, माजी संचालिका अंजना रेडेकर, दशरथ अमृते, जनार्दन टोपले, राजेंद्र सावंत, विलास नाईक, तानाजी देसाई आदींनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याचा कायम मालमत्ता वाढीव मूल्यांकन निधी गेल्यावर्षी शून्य किंमत असताना यावर्षी ८३ कोटी ५३ लाख कोटी दाखविले होते. १९९७ च्या जुन्या मशिनरींची किंमत आता इतकी होऊ शकते काय, असा प्रश्न आहे. कारखान्याच्या राखीव निधीतून चालू वर्षी १ कोटी ७३ लाख रुपये कमी केले आहेत. या रकमेचा वापर कुठे केला, याचा खुलासा होणे जरुरीचे आहे. गेल्या वर्षीचे गाळप विचारात घेतले तर त्या तुलनेने यंदा गाळप कमी झाले असून ते २.६८ इतके आहे. असे असताना एकूण उत्पन्नात २६ कोटी रुपयांची घट होऊनही नफा- तोटा पत्रकात संस्थेचा नफा १ कोटी ३१ लाख १६ हजार दाखविला आहे. ही पळवाट आहे. याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.