कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बुद्रूक येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने (गोडसाखर) यंदाच्या हंगामामध्ये ४ लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी ऊस गळीतासाठी पाठवावा, असे आवाहन उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले आहे. मंगळवार (दि. २४) कारखाना कार्यस्थळावर तोडणी वाहतूक यंत्रणेमधील प्रतिनिधींन अॅडव्हान्सचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
गडहिंग्लज कारखान्याकडे गळीत हंगाम २०२४- २५ या हंगामाकरिता करार केलेल्या तोडणी वाहतूक यंत्रणेस अॅडव्हान्स देण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने जिल्हा बँकेमार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध झाले आहे. त्याचे प्रातिनिधीक वितरण यावेळी करण्यात आले. तोडणी वाहतूकदार अभिजित पाटील, दत्ताजीराव देसाई, सुनील नांदवडे, विकास पाटील, कृष्ण रोटे यांना अॅडव्हान्स रकमेपैकी पहिल्या हप्त्याचा प्रत्येकी ५ लाखांचा धनादेश वाटप करण्यात आला. उपाध्यक्ष चव्हाण, संचालक सतीश पाटील,प्रकाश पताडे, अशोकराव मेंडुले, बाळासोा देसाई – मिणचेकर, काशीनाथ कांबळे, एस. व्ही. हरळीकर, व्ही. एच. गुजर, व्ही. बी. पाटील, जी. एस. पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.