सोलापूर : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधरण सभा चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले की, श्री शंकर सहकारीसाठी केंद्र व राज्य सरकारने ११३ कोटीची मदत केली आहे. अडीच हजार टनी साखर कारखाना आता सात हजार टनी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १७० कोटीची गुंतवणूक करावी लागेल. विविध ११० कोटी वित्तीय संस्थाकडून तर ६० कोटी रुपयांची गुंतवणूक कारखान्याकडून गुंतवणुक करावी लागणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
कारखान्याचे जनरल मॅनेजर रवींद्र जगताप यांनी अहवाल वाचन केले. त्याला सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. यावेळी खा. धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घामातून उभा राहिल्या आहेत. संस्था बंद पडली तर काय होते हेही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, कामगारांनी पाहिले आहे. सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येकाला आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या या संस्था मोडीत काढू नका. रणजितदादांच्या कडक शिस्तीत कारखाना प्रगतीपथावर आहे. राजकारणासाठी कोणी शेतकऱ्यांची संस्था मोडीत काढत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी. वार्षिक सभेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, व्हा चेअरम अॅड. मिलींद कुलकर्णी, अॅड. प्रकाश पाटील, रामचंद्र सावंत पाटील, दत्तात्रय भिलारे, बाबाराजे देशमुख, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते- पाटील, एक्झीक्युटर डायरेक्टर स्वरुप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजीत डुबल आदी उपस्थित होते.