पुणे : माळेगाव कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने २.४० लीटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी आग्रही आहे. तर विरोधकांनी सदर प्रकल्प पाच लाख लीटर क्षमतेचा उभारावा यासाठी सभासदांमध्ये जनजागृती केली जात आहे. सत्ताधारी संचालक मंडळ व विरोधकांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्पावर गावागावात वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकल्पाबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत फैसला होणार आहे. यामुळे सोमवारी (दि. ३०) होणारी सभा अतिशय महत्त्वाची असून ती वादळी होण्याची शक्यता आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी नेमका कोणत्या प्रकल्पाच्या बाजूने उभा राहणार, याची उत्सुकता लागली आहे. सद्यस्थितीत इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीवरून सत्ताधारी संचालक मंडळ व विरोधकांनी कार्यक्षेत्रातील गावांमध्ये बैठका घेऊन रान पेटवले आहे.
यंदा कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने या वर्षी ३६३६ रुपये प्रति टन विक्रमी दर दिल्याने अध्यक्ष केशवराव जगताप व संचालक मंडळाचा गावोगावी शेतकरी सत्कार करीत आहेत. या माध्यमातून संचालक मंडळ २.४० लीटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प कसा फायदेशीर आहे, असे सभासदांना सांगत आहेत. विरोधक दिशाभूल करून पाच लाख लीटर क्षमतेचा इथेनॉल निर्मिती प्रकल्प सभासदांच्या माथी मारून कारखान्याचे नुकसान करत आहेत असा आरोप केला जात आहे. दुसरीकडे विरोधक चंद्रराव तावरे हेदेखील पाच लाख लिटर क्षमतेचा इथेनॉलनिर्मिती प्रकल्प कसा फायदेशीर आहे, यासाठी गावोगावी सभासदांमध्ये जनजागृती करत आहेत. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना प्रति टन ५००- ६०० रुपये आर्थिक फायदा होणार असल्याचे पटवून देत आहेत. त्याचे पडसाद कारखान्याच्या वार्षिक सभेत उमटण्याची शक्यता आहे.