धाराशिव : कळंब तालुक्यातील रांजणी येथे सोमवारी नॅचरल उद्योग समूहातील नॅचरल ऑरगॅनीक फ्रुट्स अॅन्ड व्हेजीटेबल प्रोड्युसर कंपनी व एडीएम अँग्रो लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती उपक्रमांतर्गत ऊस, सोयबीन, हरभरा उत्पादकांचा शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून याचे आयोजन केले होते. नॅचरल शुगर कारखाना परिसरातील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एन. साई मल्टीस्टेटचे संचालक कनामे यांची उपस्थिती होती. कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी ऊस लागवडीसाठी निवडावयाच्या ऊसाच्या जाती, बेणे तसेच ऊस रोप या माध्यमातून लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती दिली. नॅचरल शुगरमार्फत अनुदानीत ऊसरोप योजना, ठिबक सिंचन योजना, माफक दरात नॅचरल पीडीएम पोटॅश, प्रक्रिया केलेले सेंद्रीय खत, गंधक यांची उपलब्धता याबाबत माहिती दिली.
यावेळी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीचे प्रा. अरूण गुट्टे यांनी हरभरा लागवडीची पंचसूत्री याबद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी सोयाबीन उत्पादनामध्ये मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अग्रेसर असून या जिल्ह्याचे सरासरी सोयाबीनचे क्षेत्र ११ लाख हेक्टर असून प्रति हेक्टरी उत्पादकता १५ क्विंटल पेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. ठोंबरे यांनी दुग्ध व्यावसायिकांना बहुमोल मार्गदर्शन केले. एडीएम अॅग्रोचे वाणिज्य विभाग प्रमुख एम. बी. गाजरे यांनी एडीएमकडून सोयाबीनसोबतच तूर आणि हरभरा या पिकांच्या मूल्य साखळी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शेतकरी मेळाव्यात ऊस, सोयाबीन आणि दूध उत्पादक एकूण २० प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याचे तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. दयानंद माने यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे प्रवर्तक डॉ. सर्जेराव साळुंके यांनी आभार मानले.