कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी एकरकमी एफआरपीप्रश्नी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिष्टाई केली. केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करावा, हंगाम २०२२-२३ हंगामातील उर्वरित प्रतिटन १०० रुपये हप्ता द्यावा, यासाठी तीन ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक आयोजित केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना तसे पत्र दिले. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या अटकेप्रश्नी राजू शेट्टी यांनी पोलिस अधीक्षकांची शेट्टी यांनी घेतली भेट घेतली.
स्वाभिमानी संघटनेने गेल्यावर्षी आधीच्या हंगामातील ऊस गाळपाबाबत प्रती टन ५० व १०० रुपयांचा हप्ता देण्यासाठी आंदोलन केले होते. या प्रस्तावाला शासनाने मान्यता न दिल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत. गेल्या १० महिन्यांपासून मुख्य सचिवांकडे प्रस्ताव पडून आहे. त्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री अमित शाह व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या दौऱ्यावेळी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ८०० हून अधिक कार्यकर्त्यांना नोटीस देऊन ताब्यात घेतले. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ३ ऑक्टोबरपूर्वी बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत सांगितले. चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.