नवी दिल्ली : साखरेचा यंदाचा हंगाम २०२४-२५ जवळ येत आहे. साखर कारखाने हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तथापि, सप्टेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र आणि देशभरात सततच्या पावसामुळे कारखान्यांच्या स्तरावर साखरेची मर्यादित विक्री झाली आहे. त्यामुळे साखर साठा वाढला आहे. परिणामी, सरकारने ऑक्टोबर २०२४ साठी मासिक साखर कोटा कमी करावा अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे. सरकारने ऑक्टोबरसाठी साखरेचा अधिक कोटा दिल्यास कारखान्यांच्या आर्थिक तरलतेवर परिणाम होऊ शकतो, असे कारखानदारांचे म्हणणे आहे.
याबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाला (DFPD) पाठवलेल्या पत्रात, साखर उद्योगातील प्रमुख संस्था विस्माने (WISMA) म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२४ साठी साखरेचा कोटा कमी करण्यात यावा. जास्त आणि सतत पडलेल्या पावसाकडे आम्ही तुमचे लक्ष वेधू इच्छितो. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीत विपरित परिणाम झाला आहे, त्यामुळे साखर कारखान्यांच्या स्तरावर साखरेची मर्यादित खरेदी डीलर्सकडून झाली.
हवामानाच्या परिस्थितीमुळे किरकोळ ग्राहकांनी पाठ फिरवली. साखर कारखानदार व व्यापारी स्तरावर ही परिस्थिती असल्याने साखरेचा साठा वाढला आहे. त्यामुळे, सप्टेंबर २०२४ च्या न विकल्या गेलेल्या कोट्याच्या विक्रीला मदतीसाठी राष्ट्रीय स्तरावर ऑक्टोबर २०२४ चा साखर कोटा २२ लाख टनांपेक्षा कमी जाहीर करणे योग्य ठरेल.
याबाबत, ‘चीनीमंडी’शी बोलताना ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, ऑक्टोबर २०२४ चा साखर कोटा २२ लाख टनांपेक्षा कमी केल्याने देशातील साखर कारखान्यांना फायदा होईल. देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे सध्याचे भाव हेच राहतील. केंद्र सरकारने साखर उद्योगाचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. अन्न मंत्रालयाने सप्टेंबर २०२४साठी मासिक साखरेचा कोटा २३.५ लाख मेट्रिक टन (LMT) दिला होता.