पुणे: राजगड सहकारी साखर कारखान्याला अडचणीत आणणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे, अशा शब्दात कारखान्याचे अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला.
राजगड सहकारी कारखान्याची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी आ. थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी ते बोलत होते. गणसंख्येअभावी सभा तहकूब करून पुन्हा अर्ध्या तासाने सुरू करण्यात आली. प्रभारी कार्यकारी संचालक प्रतापराव पाटील यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांच्या संमतीने मंजुरी देण्यात आली. राजगड कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास मंडळाचे (एनसीडीसी) मंजूर झालेले कर्ज नामंजूर करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे.
राजगड कारखाना १५ नोव्हेंबरनंतर शंभर टक्के चालू करणार. त्या अगोदर कामगारांचा पगार कसा देता येईल याचा आम्ही विचार करतोय, असेही थोपटे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव सुके, के.डी. सोनवणे, शिवाजीराव कोंडे, प्रतापराव शिळीमकर, दत्तात्रय चव्हाण, दिनकर घरपाळे, शोभा जाधव, सुरेखा निगडे, गीताजंली शेटे, सुवर्णा मळेकर, उत्तम थोपटे, धनंजय वाडकर, सोमनाथ सोमाणी, मदन खुटवड व सर्व संचालक मंडळ, सभासदांची उपस्थिती लक्षणीय होती. सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, वेल्हा केले तर आभार उपाध्यक्ष पोपटराव सुके यांनी मानले.