नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत असताना विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्पाच्या कर्जाचे हप्ते वेळेत परतफेड केली आहेत. आता भविष्याचा वेध घेत विविध उपपदार्थ निर्मितीचे प्रयत्न सुरू असून इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्यासोबतच सीएनजी सिबीसी हायड्रोजन पोटॅश निर्मिती प्रस्तावित आहे, मात्र पूर्ण अभ्यास करूनच हे निर्णय घेतले जातील, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले. कादवा कारखान्याची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी श्री. शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष शेटे म्हणाले की, कारखान्यावर कोणतेही थकीत कर्ज नाही. कारखान्याने ऊस बिलापोटी संपूर्ण एफआरपी अदा केली आहे. गत आर्थिक वर्षात कादवाला सहा कोटी ३२ लाख ५३ हजार रुपयांचा भरघोस नफा झाला आहे. सचिन बर्डे, सुरेश डोखळे यांनी दोन हजाराच्या आतील शेअर्स जमा करण्याच्या धोरणास विरोध करत विविध प्रश्न उपस्थित केले. शेटे यांनी सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. संचालक शहाजी सोमवंशी यांनी स्वागत केले. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, कैलास मवाळ, शिवसेनेचे सुनील पाटील, कादवाचे माजी संचालक शिवाजीराव जाधव, सुरेश डोखळे, सचिन बर्डे, प्रकाश शिंदे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, विलास कड आदी उपस्थित होते.