कोल्हापूर : एक टन उसाच्या उत्पादन खर्चाचा विचार केल्यास या वर्षी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये द्यावेच लागतील. माळेगाव कारखान्याने उतारा कमी असतानाही उसाला प्रती टन ३,७५० रुपये दर दिला आहे. याउलट कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ऊस चांगला असताना कारखानदार उसाला केवळ ३,२०० रुपयांपर्यंत दर देत आहेत. कारखानदार शेतकऱ्यांची ही लूट तत्काळ थांबविली पाहिजे आणि या वर्षीच्या गळीत हंगामात उसाला प्रती टन पहिली उचल पाच हजार रुपये द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली आहे.
याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले की, सरकारने दोन कारखान्यांतील हवाई अंतर कमी केले पाहिजे. राष्ट्रीय महामार्गावरील भराव कमी करून पूरस्थिती कमी करावी. पंचगंगा नदीवर रस्त्याच्या नावाखाली भिंती बांधून नदीचा प्रवाह रोखला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी महापुराचा सामना करावा लागतो. पुरामुळे शेती उद्ध्वस्त होत आहे. रस्त्याच्या नावाखाली महापूरप्रवण क्षेत्रात, पुराचे पाणी साचते. त्यामध्ये भराव टाकले जात आहेत. तसेच पंचगंगा प्रदूषण तातडीने रोखण्याची गरज आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडले जात आहे. हे प्रदूषण तत्काळ कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी नागपूर – रत्नागिरी मार्गावर पूर भागात भराव न टाकता उड्डाणपूल करण्याची मागणी केली. या वेळी प्रगती चव्हाण, ज्योतिराम घोडके, गुणाजी शेलार, जयश्री सरीकर उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.