साखरेला कमीतकमी ४२०० दर मिळावा, निर्यातीला परवानगी देण्यात यावी : वैभव नायकवडी

सांगली : यापुढे सहकारी साखर कारखान्यांना केवळ साखर निर्मिती करून चालणार नाही. वेगवेगळे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभे केले तरच साखर उद्योगात टिकता येईल, असे प्रतिपादन हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे २०२४-२५ या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, लवकरच इथेनॉल आणि साखरेचे दर सरकारकडून जाहीर केले जातील. मात्र साखरेला कमीतकमी ४२०० रुपये दर मिळालाच पाहिजे. आज जगाच्या बाजारात साखरेला किंमत आहे. आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त साखर शिल्लक आहे. अशावेळी निर्यातीला परवानगी दिली पाहिजे. याचा फायदा साखर उद्योगाला होईल. आधुनिकीकरण करून प्रतिदिन ५० हजार लिटर इथेनॉल निर्मिती करण्याचा ‘हुतात्मा’चा प्रयत्न आहे.

अध्यक्ष वैभव नायकवडी म्हणाले, या हंगामात पूर्ण क्षमतेने प्रतिदिन ५ हजार टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे. हंगामात एकूण ६ लाख ५० हजार टन उसाचे गळीत, १२.७५ टक्के साखर उतारा, १ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती, प्रतिदिन ५ टन बायोसीएनजी प्रकल्प आदी उद्दिष्टे आहेत. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी स्वागत केले. यावेळी संचालक गौरव नायकवडी, केदार नायकवडी, वीरधवल नायकवडी, विशाखा कदम, जयश्री अहिर, डॉ. सुरेश कदम यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here