नांदेड : गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

नांदेड : मागील वर्षात नांदेड जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचे फक्त आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात अत्यंत कमी दर दिले. वाहतूक व तोडणी दरवाढीमुळे शेतकऱ्यांना एफआरपी कमी बसली. त्यामुळे साखर कारखानदारांनी यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाचे दर जाहीर करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यंदा उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मितीवरील बंदी केंद्र सरकारने उठविली आहे. यातून साखर कारखान्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढेल असा दावा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

‘स्वाभिमानी’चे हरिभाऊ कदम, किशनराव देळूबकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वानखेडे, हदगाव तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर आदींनी निवेदन देताना सांगितले की, मागील वर्षीच्या उसाला कमी मिळालेला दर यामुळे नांदेड जिल्ह्यात ऊसदर व पहिली उचल यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. संघर्षाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी उसाला एकरकमी ३३०० रुपये प्रती टन पहिली उचल मिळावी, मागील तीन वर्षांचे आरएसएफचे हिशेब तपासावेत. प्रत्येक कारखान्याच्या वजन काट्याजवळ ऊस दराचा फलक व उसाचे वजन बाहेरील खासगी वजन काट्यावर करून आणता येईल असा फलक लावावा, अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here