कोल्हापूर : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना या गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास कारखान्याचे संचालक साजिद मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
साजिद मुश्रीफ म्हणाले की, कारखान्याने यंदा ११ कोटी युनिट्स वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी आठ कोटी युनिट वीज इतरत्र दिली जाईल. कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प सुरुवातीला ३० हजार लिटर क्षमतेचा होता. क्षमता वाढवून तो ५० हजार लिटर क्षमतेचा केला. सध्या एक लाख ९५ हजार लिटर क्षमता आहे. तर तीन कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे. गेल्या हंगामापासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. यावर्षी पाऊसमान चांगले झाल्यामुळे ऊस उपलब्धताही योग्य प्रमाणात होणार आहे.