कोल्हापूर : ‘शाहू साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे,’ असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याने ११ कोटी युनिट्स वीज निर्मिती आणि तीन कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे ध्येय ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक, संचालिका रेखाताई पाटील, सुजाता तोरस्कर यांच्यासह माजी कार्यकारी संचालक विजय औताडे उपस्थित होते.
मागील गळीत हंगामाचा आढावा घेताना कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले की, व्यवस्थापनाने दिलेली उद्दिष्टपूर्ती सर्व सभासद, शेतकरी बंधू-भगिनी यांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्यामुळे नेहमीच यशस्वी झाली आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात सुद्धा उद्दिष्टपूर्तीसाठी सभासद शेतकऱ्यांनी उसाची इतरत्र विल्हेवाट लावू नये. संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे. यावेळी नवोदिता घाटगे यांच्या हस्ते व कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे व युवराज आर्यवीर घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. कार्यक्रमास शाहू ग्रुपचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते.