कोल्हापूर : यंदा कोल्हापूर जिल्ह्यात पुराने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पूरबाधित ऊस तोडणीकडे कारखानदारांचा कानाडोळा होवू शकतो. यासाठी पूरबाधित उसाची तोडणीचे वेळापत्रक करण्याची गरज आहे. साधारणपणे ४० हजार हेक्टरवरील उसाला महापुराचा फटका बसला आहे. ऊस तोडणी करताना चांगला आणि पूरबाधित असा निम्मा-निम्मा ऊस तोडला जावा अशी मागणी इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य व ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी केली आहे. नरके यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.
डॉ. नरके यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे मोठ्या प्रमाणात महापुरात नुकसान झाले. याचे प्राधान्याने पूर बाधित ऊस तोडणीचे नियोजन करायला हवे. यापूर्वीच्या महापुरावेळी साखरेचा उतारा कायम रहावा, ऊस तोडणी टोळ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी चक्राकार (रोटेशन) पध्दतीने पूरबाधित उस गाळपाचे नियोजन करण्याचे ठरले होते. तसा निर्णय घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर उसापैकी बहूतांश ऊस दहा ते पंधरा दिवस महापुराखाली होता. शेतातील उभे पिक गेल्याशिवाय नवीन पिकाची लागवड होणार नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. नदी काठावरील खराब झालेला ऊस शेतातच उभा राहिला तर शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. त्यामुळे त्वरीत याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी नरके यांनी केली आहे.