सोलापूर : ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये ओंकार साखर कारखान्याच्या चांदापुरी युनिट एकला ऊस पुरवठा केला आहे, त्यांना उसाच्या प्रमाणात दिवाळी सणानिमित्त मोफत साखर दिली जाणार आहे. कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे – पाटील यांनी ही माहिती दिली. एक ते ३० टनापर्यंत ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांना १० किलो साखर, ३१ ते ५० टनापर्यंत २० किलो, ५१ ते १०० टनापर्यंत ३० किलो, १०१ ते १५० टनापर्यंत ४० किलो, १५१ ते २०० टनापर्यंत ५० किलो, २०० ते ३०० टनाला ७० किलो ३०० टनाच्या पुढे १०० किलोप्रमाणे साखर दिली जाईल. कारखाना कार्यस्थळावर २२ ऑक्टोबरपासून साखरेचे वाटप करण्यात येणार आहे.
चेअरमन बोत्रे- पाटील म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून दिवाळी सणानिमित्त ओंकार साखर परिवाराच्यावतीने शेतकऱ्यांना उसाच्या प्रमाणात मोफत साखर देण्याची परंपरा याहीवर्षी चालू ठेवली आहे. शेतकऱ्यांना व कामगारांना जे शक्य आहे, ते देण्यासाठी परिवार कटिबद्ध आहे. ओंकार परिवाराचे संचालक प्रशांत बोत्रे-पाटील, जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे उपस्थित होते. ऊस उत्पादकांनी कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केन मॅनेजर शरद देवकर यांनी केले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.