कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ साखर कारखानदार विधानसभेच्या मैदानात शड्डू ठोकण्याच्या तयारीत

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारणाने गती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांपैकी तब्बल १३ साखर कारखानदार निवडणुकीचा मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी हायव्होल्टेज निवडणुकांचे रणांगण पहायला मिळणार आहे. १३ साखर कारखान्यांचे चेअरमन अथवा संचालक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने गळीत हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

संताजी घोरपडे कारखान्याचे सर्वेसर्वा हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शाहू समूहाचे प्रमुख समरजित घाटगे अशी लढत रंगतदार असेल. त्यामध्ये बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढत सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे संचालक विरेंद्र मंडलिक यांनीसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे .इचलकरंजी मतदारसंघातून जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल आवाडे हे भाजपकडून मैदानात असणार आहेत. शिरोळ मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि शरद साखर सहकारी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आणि गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

करवीर मतदारसंघातून दिवंगत आमदार भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष कै. पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील, कुंभी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके निवडणूक मैदानात असणार आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून आमदार ऋतुराज पाटील, राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार अमल महाडिक हे रिंगणात असणार आहेत. बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, माजी उपाध्यक्ष राहिलेले ए. वाय. पाटील हे राधानगरी भुदरगड विधानसभा निवडणुकीसाठी दंड बैठका मारत आहेत. वारणा साखर कारखान्याचे चेअरमन, जनसुराज्य शक्तीचे अध्यक्ष विनय कोरे हे माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्या विरोधात पुन्हा एकदा पन्हाळा – शाहूवाडी विधानसभा मतदार संघातून रिंगणात असतील. चंदगड विधानसभा मतदारसंघातून ‘अथर्व-दौलत’चे मानसिंग खोराटे यांनीही निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here