वादळी पावसाने फिरवले शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी; भाताचे मोठे नुकसान

पुणे : राजगड तालुक्यासह सिंहगड, पश्चिम हवेली भागात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे कापणीस आलेले भाताचे पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने भाताचे पीक जोमात आले होते. इंद्रायणी, साळ आदी जातीचे भात कापणीस आले आहे. परंतु, वादळी पावसामुळे भात जमीनदोस्त झाले आहे. राजगड तालुक्यातील पानशेत, कादवे, निगडे मोसे, आंबेड, पाबे, विझंर आदी भागात तसेच हवेली तालुक्यातील सोनापूर, आंबी, खामगाव मावळ, कल्याण, आर्वी, मांडवी, सांगरुण, जांभली भागात भात पिकाला वादळी पावसाचा मोठा फटका बसला.

सततच्या पावसामुळे भाताचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांना मार बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात भाताच्या कापणीस सुरुवात होते. परंतु, पावसाने धुमाकुळ घातल्याने उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार आहे. राजगड तालुक्यात 6500 हेक्टर, तर हवेली तालुक्यात 3800 हेक्टर क्षेत्रावर भाताची लावणी झाली आहे. पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पानशेत (ता. राजगड) कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी श्रीधर चिंचकर म्हणाले, वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित कृषी सहायकांना दिले आहेत. वीमा काढलेल्यांनी नुकसानीची ऑनलाईन तक्रार 72 तासात संबंधित विमा कंपनीकडे दाखल करायची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here