राज्यातील साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार

पुणे : साखर आयुक्तालयाच्यावतीने साखर कारखान्यांमध्ये सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी साखर आयुक्तांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव, साखर सहसंचालक (उपपदार्थ) अविनाश देशमुख, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले यांसह साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, महाप्रीत, मेढा, वित्त पुरवठादार, सौरऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. साखर उद्योगाने सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यास पुढे यावे, असे आवाहन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

साखर सहसंचालकअविनाश देशमुख यांनी साखर कारखान्यांसाठी सौरऊर्जेची असलेली संधी आणि त्यातील आव्हाने, आर्थिक मॉडेल, कर्ज उभारणी व त्याचा परतफेड कालावधी आणि फायद्यांबद्दल मार्गदर्शन करून सादरीकरण केले. साखर आयुक्त डॉ. खेमनार यांनी सांगितले की, साखर उत्पादनाशिवाय उपपदार्थ आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पन्नाचे नवनवे स्रोत निर्माण करणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यादृष्टीने साखर उद्योगांनी प्रयत्न करावेत. साखर कारखान्यांना त्यासाठी लागणारे मार्गदर्शन साखर आयुक्तालयाकडून निश्चितपणे केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संजय खताळ व इतरांनीही आपले विचार मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here