कोल्हापूर : राज्यात सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबरपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अक्षरश: ढगफुटीसदृश पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरिपातील हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय ऊस गळीत हंगामावरही परिणाम होण्याची भीती आहे. ऊस नेण्याच्या रस्त्यांवर, पाणंदी मध्ये पाणीच पाणी असून, चिखलमय पाणंद रस्त्यांवरून वाहतूक सुरू होण्यासाठी किमान एक महिना अवधी लागू शकतो. इतर ठिकाणच्या उसाची उपलब्धता बघितल्यास कारखान्यांचा गळीत हंगाम १५ दिवस लांबण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य शासनाने १० नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करावेत, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे कारखानदारांनी बॉयलर प्रदीपन करून ऊस तोडणी कामगारांची जमवाजमव सुरू केली आहे. कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस आणि रस्त्यांच्या स्थितीचा विचार करता यावर्षी डिसेंबर महिन्यात कारखान्यांची धुराडी पेटतील, असे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये मोसमी पाऊस संपल्यानंतर काही दिवस परतीचा व नंतर अवकाळी पाऊस असतो. पण या वर्षीचा पावसाळा काही निराळाच दिसत आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात २.५५ कोटी टन ऊस उपलब्ध आहे. यामुळे १२० दिवस कारखाने चालतील, असा अंदाज आहे. दोन्ही जिल्ह्यांतील ४० साखर कारखान्यांकडून प्रतिदिन २ लाख २५ हजार मेट्रिक टन गाळपाची क्षमता आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.