नंदुरबार : यंदा पाऊस लांबल्याने आणि तीनपैकी दोन कारखान्यांची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने त्यांचे बॉयलर अग्निप्रदीपन दसऱ्याला होऊ शकले नाही. आयान शुगरचे दिवाळीमध्ये अग्निप्रदीपन होण्याची शक्यता आहे. मात्र, इतर दोन कारखाने सुरू होतील की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही स्थिती असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आदिवासी साखर कारखाना सुरू व्हावा, यासाठी संचालक मंडळाने कंबर कसली आहे.
गेल्यावर्षी शहाद्याचा सातपुडा साखर कारखाना काही अडचणींमुळे बंद होता. नंदुरबारच्या आयान शुगर लिमिटेड कारखान्याने सर्वाधिक साखर उत्पादन घेतले. तर नवापूरचा आदिवासी साखर कारखान्यानेदेखील आपल्या गाळप क्षमतेप्रमाणे उत्पादन घेतले होते. यंदा तीनपैकी केवळ आयान कारखाना सुरु होण्याची शक्यता आहे. सातपुडा साखर कारखाना पाच हजार मे.टन प्रतिदिन ऊस गाळप क्षमतेचा आहे. या कारखान्याने गेले दोन, तीन हंगाम वगळता दरवर्षी पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचा प्रयत्न केला आहे. आयान शुगर पूर्वी सहकारी तत्त्वावर होता. खासगी कंपनीने तो विकत घेतल्यानंतर गाळप क्षमता थेट १० हजार मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेवर गेली. आदिवासी साखर कारखाना १,२५० मे.टन प्रती दिन ऊस गाळप करतो. यंदा पाऊस लांबल्याने साखर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. मात्र, उसाचे क्षेत्र साधारणतः चार ते पाच हजार हेक्टरने घटले आहे.