महाराष्ट्र : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळातून दहा लाख मजुरांना मिळणार लाभ

पुणे : राज्यातील संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी यासह अन्य जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा लाख ऊसतोड कामगार आहेत. ऊस गळीत हंगामामध्ये दुर्दैवाने ऊसतोड मजूर, मुकादम बैलगाड्यांना अपघात झाल्यास, त्यांच्यासाठी राज्य शासनाने सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. राज्यातील १२७ सहकारी साखर कारखाने आणि १२९ खासगी क्षेत्रातील कारखान्यांवर काम करणाऱ्या ऊसतोड मजुरांना त्याचा लाभ होणार आहे. राज्यात साखर उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून सध्या राज्यातील साखर कारखान्यांमध्ये अंदाजे ८ ते १० लाख ऊसतोड कामगार या क्षेत्रात काम करतात.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या परिसरातील ऊस शेती, फडावर स्थलांतरीत होऊन काम करतात. ऊस तोडणी व वाहतूक करताना होणारे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा मृत्यू ओढल्यास कुटुंबाचे उत्पन्न बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम, त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरिता अपघात विमा योजना तसेच त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरिता विमा संरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.

संरक्षण कालावधी…

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना ऊस गाळप हंगामाच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या कालावधीत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांना किंवा त्यांच्या वैलांना केव्हाही अपघातामुळे मृत्यू झाला किंवा अपघातामुळे अपंगत्व आले, तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.

…असे आहे अनुदान

झोपडीला आग लागल्यास १० हजार रुपये, वैयक्तिक अपघात (मृत्यू) झाल्यास ५ लाख रुपये, वैयक्त्तिक अपघात (अपंगत्व) आल्यास अडीच लाख रुपये, वैयक्तिक अपघात झाल्यास वैद्यकीय खर्चासाठी ५० हजार रुपये, बैलजोडी लहान – मृत्यू, अपंगत्व आल्यास ७५ हजार रुपये, बैलजोडी मोठी – मृत्यू, अपंगत्व आल्यास १ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

समितीची स्थापना…

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेची मदत त्वरित मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी, प्रादेशिक सहसचालक (साखर) किंवा त्यांचा सदस्य, व्यवस्थापक, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार हे या समितीचे सदस्य आहेत. तर सहायक आयुक्त, समाजकल्याण हे सदस्य सचिव आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here