सागंली : क्रांती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यावर्षीची ऊसक्षेत्र नोंदणी १५ टक्क्यांपर्यंत कमी असताना सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे आडसाली ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्याचे काम ऊस विकास विभागाच्यावतीने सुरू आहे. तरीही गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कारखाना १३ लाख मेट्रिक टन इतके उच्चांकी ऊस गाळप करून जिल्ह्यात प्रथमस्थानी राहील, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याच्या २०२४- २५ च्या गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते.
बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे संस्थापक संचालक आमदार अरुण लाड, अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे संचालक सौ. व श्री. संग्राम जाधव या उभयतांच्या हस्ते पार पडला. यंदाही कारखाना उच्चांकी ऊस गाळप करेल असा विश्वास अध्यक्ष लाड यांनी व्यक्त केला. कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांनी प्रास्ताविक केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. पवन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.