पुणे : इंदापूर तालुक्यातील येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व निरा- भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम सन २०२३-२४ साठी ऊसबिलाचा दिवाळीसाठी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मंगळवारी (दि. २२) वर्ग करण्यात आला. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व निरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी ही माहिती दिली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही कारखाने उत्कृष्टरीत्या कार्यरत आहेत. या दोन्ही कारखान्यांनी यापूवी शेतकऱ्यांना २ हजार ७०० रुपयांप्रमाणे ऊसबिलाची रक्कम वेळेवर अदा केली आहे. कर्मयोगी व निरा-भीमा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना ऊसबिलाचा दीपावलीसाठी २०० रुपयांप्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राजवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी दिली.
या दोन्ही कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिवाळीसाठी देण्यात येणार आहे. आगामी सन २०२४- २५च्या गळीत हंगामासाठी दोन्ही कारखाने सज्ज झाले आहेत. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सवींनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील या प्रसंगी त्यांनी केले. या दोन्ही कारखान्यांमध्ये कामगारांचे पगार नियमितपणे होत आहेत. मात्र, गैरसमज निर्माण करून कारखान्याची बदनामी केली जात आहे. कारखान्यासंदर्भात चुकीच्या गोष्टी करू नका, या संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, असे आवाहन या वेळी राजवर्धन पाटील यांनी केले. या प्रसंगी निरा-भीमा कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. दोन्ही कारखान्यांचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक या प्रसंगी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.