कोल्हापूर : ‘गोडसाखर’च्या प्रशासनाने यंदाच्या हंगामात चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य ठेवून नियोजन सुरु केले आहे. त्यासाठी ३५० टोळ्यांशी करार करण्यात आला आहे. कारखाना सुरु होण्यास असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे कामकाज हाती घेतल्यानंतर कामगारांना पाच पगार दिले होते. दरम्यान, साखर विक्रीची अडचण आल्यामुळे कामगारांचे पगार थकले आहेत. कारखान्याची साखर तातडीने विक्री करण्याचे कारखान्याचे नियोजन असून, यातून आणखी पाच पगार देण्याचे नियोजन केले आहे.
गतवर्षी कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखान्याला ५५ कोटी रुपये दिले. मात्र, मशिनरीची कामे नव्याने केल्यामुळे अनेकदा कारखान्याचे दररोज ठरलेले गाळप साध्य करता आले नाही. त्यामुळे कारखान्याला गतवर्षीचा हंगाम फायद्यात आणता आला नाही. जिल्हा बँकेचे थकीत ठेवलेले पैसे व तत्कालीन अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी ऐनवेळी दिलेला राजीनामा या सर्व घडामोडींमुळे यंदाचा हंगाम सुरू होणार कि नाही, असा सवाल उपस्थित केला जात होता. पण नव्या पदाधिकाऱ्यांनी गाळप हंगामाचे नियोजन केल्याने शेतकरी आणि कामगार सुखावला आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.