हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर, ता. 25 : ज्या प्रमोण चॉकलेट, ज्युस विविध फळांच्या आणि फुलांच्या स्वादाची मिळत आहेत. त्याच पध्दतीने साखरही आता आंबा, फणस, अननस, संत्री, सफरचंद, केळी, चिंचेच्या स्वादाची मिळणार आहे. राष्ट्रीय साखर संस्थेच्या (एनएसआय) संशोधकांनी फळांच्या स्वादाची साखर निर्मिती करण्यात यश मिळवले आहे.
भारतात सर्वाधिक साखरेची निर्मिती झाली आहे. देशातील प्रत्येक गोडावूनमध्ये विक्रीविना साखरेच्या थप्प्या पडून आहेत. हीच साखर विक्री वाढविण्यासाठी फळांच्या स्वादाची (फ्लेव्हरमध्ये) साखर निर्मितीचा पर्याय पुढे आला आहे. एनएसआयच्या संशोधकांनी धामपूर आणि डीसीएम श्रीराम ग्रुपसोबत फ्लेव्हर्ड साखर निर्मितीचा करार केला आहे. पुढील हंगामात अशा पध्दतीची साखर मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल. अशी चिन्ह आहेत. या साखरेला परदेशातूनही मोठी मागणी येवू शकते असा संशोधकांचा अंदाज आहे. श्रीलंका, नायजेरियासह इतर देशही फ्लेव्हरर्ड साखर खरेदी करण्याची तयारी दर्शवत आहेत.
महाराष्ट्रातही अशा पध्दतीची साखर निर्मिती झाल्यास अतिरिक्त साखरेचा प्रश्न निकालात निघू शकतो. विविध पदार्थांमध्येच थेट स्वादिष्ट साखरेचा वापर होवू शकणार आहे. त्यामुळे मागणीही वाढणार यात शंका नाही. त्यामुळे, साखरेला फळांचा स्वाद मिळाला तर शेतकरी आणि कारखानदारांनाही अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत.