बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांच्या दरामध्ये तफावत आहे. आम्ही हक्काचे पैसे मागत असून शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा उभारल्यास उसाला योग्य भाव मिळू शकतो, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. बेडकिहाळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अप्पासाहेब पाटील होते. महाराष्ट्र प्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी उसाला दर द्यावा. यासाठी शेतकऱ्यांनी एकसंध होण्याची गरज आहे. २५ रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळण्यासाठी १९९२ पासून लढा चालू आहे. त्यावेळी ८०० रुपये प्रतिटन दर होता. आजही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढावे लागत आहे. राजेंद्र गड्यान्नावर यांनी सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चळवळ उभी करून आजतागायत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळवून दिला आहे. माजी मंत्री शशिकांत नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. तात्यासाहेब कस्ते यांनी स्वागत केले. राजू शेट्टी व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पंकज तिप्पणवर, रावसाहेब बस्सनवर, राजू खोत, अशोक झेंडे, संतोष पाटील, अजित पाटील, कर्नाटक शेतकरी संघटनेचे नेते गणेश इरगार, विकास समगे, अण्णासाहेब शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते. सुकुमार सोबाणे यांनी सूत्रसंचालन केले. राजू खिचडे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.