लातूर : निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना प्रा. लि.च्या वतीने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत साखर वितरण करण्यात येत आहे. बुधवारी माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते या मोफत साखर वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी धनगर समाजातर्फे माजी मंत्री पाटील -निलंगेकर व कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांचा पारंपरिक पोषाख देऊन सत्कार करण्यात आला. आगामी काळात कारखान्याच्या माध्यमातून सहप्रकल्प राबवला जाईल अशी घोषणा माजी मंत्री पाटील-निलंगेकर यांनी यावेळी केली.
कारखान्याचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील म्हणाले, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यंदाच्या वर्षी अधिकाधिक गाळप करून जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच डिस्टीलरीचे लोकार्पण होणार आहे. तर आ. निलंगेकर म्हणाले की, कारखान्याच्यावतीने दिलेली ही साखर मोफत नसून कारखाना यशस्वीपणे चालण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला त्यांच्या हक्काची ही साखर आहे. याही वर्षी कारखाना मोठे गाळप करेल. साखर वाटपाच्या माध्यमातून ३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना साखर वाटप होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ कार्यकर्ते व्यंकट धुमाळ, भाजप निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, संगांयो समिती अध्यक्ष शेषेराव ममाळे, माजी सभापती संजय दोरवे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.