महाराष्ट्र : आतापर्यंत २०२ साखर कारखान्यांकडून गाळप परवान्यांसाठी अर्ज

पुणे : राज्यात यंदा २०२ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम २०२४-२५ साठी अर्ज आले आहेत. गेल्यावर्षी कमी पाऊस पडल्याचा फटका ऊस पिकाला बसला आहे. त्यामुळे गाळपासाठी परवाना मागणाऱ्या साखर कारखान्यांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्यावर्षी २०८ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. मात्र, कमी पाण्यावर जोपासलेल्या उसाला जूनपासून पडत असलेल्या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे ऊस क्षेत्र कमी असले तरी एकरी उतारा चांगला पडण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ४० पैकी ३३ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु करण्यास परवान्याची मागणी केली आहे. यात भैरवनाथ विहाळ, मकाई करमाळा, आदिनाथ करमाळा, मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट याशिवाय स्वामी समर्थ, संतनाथ वैराग, लोकशक्ती या कारखान्यांचा समावेश नाही. तर राज्यात मागील वर्षी साखर हंगाम जेमतेम दिवस चालला होता. तेव्हा २०८ साखर कारखाने सुरू राहिले होते. मात्र, पाऊस कमी पडल्याने ऊस क्षेत्र कमी झाले. परिणामी यंदाचा गाळप हंगामही कमीच होण्याची शक्यता आहे. २०२ साखर कारखान्यांनी सध्या परवान्यांची मागणी केली आहे. मात्र, आणखी काही साखर कारखान्यांकडून गाळप परवान्याची मागणी होण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस चांगला पडल्याने उसाचे एकरी वजन वाढेल. उसाचा साखर उतारा वाढण्यासाठी दिवसा ऊन व रात्री थंडी पडणे अपेक्षित आहे असे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here