कोल्हापूर : वेस्टर्न इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी व पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांना पत्र पाठवून साखरेच्या एमएसपीमध्ये वाढकरावी आणि इथेनॉलचा दर वाढवावा अशी मागणी केली आहे. याबाबत २५ ऑक्टोबर रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करता साखरेची एमएसपी व इथेनॉल दर वाढवावेत, अन्यथा साखर कारखाने बंद ठेवावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
राज्य साखर संघ व शुगर मिल्स असोसिएशनच्यावतीने केंद्र सरकारकडे साखरेच्या एमएसपी दरात वाढ करावी, इथेनॉल दर प्रतिलिटर ५ रुपयांनी वाढवावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आता साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करणे शक्य नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे कारखानदार अस्वस्थ आहेत. शुक्रवारी ‘विस्मा’चे अध्यक्ष ठोंबरे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. त्यात एमएसपी वाढीची मागणी केली आहे. २०१८-१९ मधील एमएसपी वाढीनंतर उसाची एफआरपी २७५० रुपयांवरून ५ वेळा वाढून ३४०० रुपये झाली. मात्र, साखरेची एमएसपी ३,१०० रुपयेच आहे. याबाबत साखर उद्योगाचा अभ्यासक पी. जी. मेढे म्हणाले की, ‘विस्मा’कडून घेतलेला निर्णय योग्यच आहे. वेळोवेळी प्रयत्न करूनही एमएसपी वाढीचा निर्णय झालेला नाही. साखर व इथेनॉल दरवाढीचा प्रथम प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.