धाराशिव : केंद्र सरकारच्या दोलायमान अवस्थेतील निर्णयांमुळे सध्या साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाही उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल शुगर नफ्यात असल्याचे कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजच्या कामगार संघटना आणि संचालकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये बोनसबाबत चर्चा होवून कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी २६ टक्के बोनस देण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी बोलताना ठोंबरे म्हणाले, मराठवाड्यातील साखर उद्योग ऊसाची उपलब्धता व पाणी टंचाई या दोन्ही समस्यांनी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी दुष्काळाच्या खाईत सापडलेला मराठवाड्यातील साखर उद्योग यशस्वी करून दाखविण्याचे काम नॅचरल शुगरने केले आहे. मला जे कांही द्यावयाचे आहे ते माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कर्मचारी बांधवांनाच द्यावयाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. चालू वर्षी चांगला पाऊस झाल्याने मांजरा धरण भरले व त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात हात आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने निर्धारीत केलेले ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. या बैठकीस कारखान्याचे संचालक, जनरल मॅनेजर, कर्मचारी संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.