पुणे : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २९) राज्यातील सर्व प्रादेशिक साखर सह संचालकांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गाळप हंगामातील परवान्याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी राज्यातील चालू गळीत हंगाम २०२४-२५ साठी प्रादेशिक साखर सह संचालक स्तरावर २०३ साखर कारखान्यांनी ऊसगाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांच्या तपासणीनंतर साखर आयुक्तालय स्तरावर गुरुवारअखेर ५९ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत अशी माहिती देण्यात आली. यंदाचा सगाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचा सन २०२१-२२ मधील प्रलंबित असलेला चार रुपये प्रती मेट्रिक टनापैकी तीन रुपये प्रति टन रक्कम भरणा केल्याशिवाय संबंधित कारखान्यास यंदाचा ऊस गाळप परवाना देण्यात येऊ नये अशा सूचना आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. हंगामासाठी सहकारी साखर कारखान्यांकडून दाखल १०१ मधून २२ आणि खासगी कारखान्यांकडून दाखल १०२ पैकी ३७ मिळून २०३ पैकी ५९ प्रस्ताव तपासून क्षेत्रीय कार्यालयातून साखर आयुक्तालय स्तरावर पुढील निर्णयासाठी पाठविले आहेत अशी माहिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. बहुतांशी कारखाने त्यानंतरच सुरू होण्याची अपेक्षा आहे असे सूत्रांनी सांगितले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.