कोल्हापूर : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची यंत्रणा पूर्णपणे निवडणुकीच्या कामात असल्याचे बहुतांशी कारखान्यांतील चित्र आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यावर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील, अशी शक्यता आहे. परतीचा पाऊस झाल्यानंतर पाऊस थांबेल असा अंदाज होता. यानुसार कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होईल, या बेताने क्रमपाळीचे नियोजन सुरू केले होते. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला असल्याने बहुतांशी मजूर निवडणूक झाल्यानंतरच करार केलेल्या कार्यक्षेत्रात येतील, अशी शक्यता आहे. सध्या शिवारात वाफसा नसल्याने हंगाम वेळेत सुरू होणे अडचणीचे ठरेल, असा अंदाज आहे.
राज्य साखर आयुक्त कार्यालयाच्या अंदाजानुसार २०२४- २५ हंगामात महाराष्ट्रात गाळपासाठी ९०४ लाख टन ऊस उपलब्ध असेल. जो गेल्या हंगामात १०७६ लाख टन गाळपाच्या तुलनेत कमी आहे. उपलब्ध उसापैकी सुमारे १२ लाख टन इथेनॉल उत्पादनासाठी वळवणे अपेक्षित आहे. यामुळे साखरेचे उत्पादन ९० ते १०२ लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील कारखान्यांनी ११० लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले. मे महिन्यापर्यंत पाण्यासाठी तरसणाऱ्या ऊस पिकाला जूननंतर आजतागायत पाण्याची फारशी गरज पडली नाही. दहा-बारा दिवसांच्या अंतराने सातत्याने पाऊस असल्याने शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी द्यावे लागले नसल्याचे चित्र विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यास केवळ पंधरवड्याचा कालावधी उरला आहे. मात्र शेतांमध्ये पाणी अद्यापही साचून आहे. त्यामुळे यंदा ऊस हंगामाचा प्रारंभ धीमा होण्याची शक्यता आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.