अहिल्यानगर : गणेश कारखान्याने मागील वर्षी उसाला इतिहासात उच्चांकी, ३००० रुपये प्रती टन भाव दिला. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांत सर्वाधिक ११.२० टक्के साखर उतारा मिळविला. कामगारांना दहा टक्के बोनस दिला.अडचणींवर मात करीत कारखान्याची वाटचाल सुरू आहे. यंदाच्या हंगामात सव्वा तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे, असे प्रतिपादन गणेश कारखान्याचे मार्गदर्शक युवानेते विवेक कोल्हे यांनी केले. कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शेजारील काळे आणि विखे सहकारी साखर कारखान्यांनी यंदा ‘गणेश’च्या कार्यक्षेत्रातील ऊस गळितासाठी नेऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोल्हे म्हणाले की, कोईमतूर येथील मूळ स्वरूपातील ऊस बेणे आणून गणेशच्या कार्यक्षेत्रात बेणे प्लॉट तयार करावे लागतील. उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी परिसरातील ऊस बेणे बदलणे महत्त्वाचे आहे. यंदा कार्यक्षेत्रात दीड लाख मेट्रिक टन उसाची नोंद झाली. चांगला पाऊस झाल्याने उसाचे एकरी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. बाहेरून ऊस आणण्यासाठी करार झाले आहेत. ऊसतोडणी मजुरांसोबत देखील करार झाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, कार्यकारी संचालक नितीन भोसले, अॅड. नारायण कार्ले, शिवाजी लहारे, यतिन गमे, गंगाधर चौधरी, जनार्दन घोगरे, महेंद्र शेळके, चंद्रभान धनवटे, विठ्ठल शेळके, नानासाहेब शेळके, धनंजय गाडेकर आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.