लातूर : किल्लारी सहकारी साखर कारखाना व बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना माझ्या नेत्यांनी साथ दिली. त्यामुळे मारुती व किल्लारी कारखाना वाचविण्याचे श्रेय माझ्याकडेच आहे, असे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. किल्लारी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या मारुती कारखान्यासाठी माझ्याच विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून सर्वसामान्य लोकांना फायदा होणार असल्याने यामध्ये मी मदतच केली, असे पवार म्हणाले.
पवार यांनी सांगितले की, आम्ही प्रयत्न करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ही दोन्ही कारखाने टिकवले आहेत. लातूर व धाराशिव जिल्ह्यातील जवळपास तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेले किल्लारी व मारुती महाराज साखर कारखाने कोणी बंद पाडले, हे सर्वांना ठाऊक आहे. कमी पैशात कारखाने विकण्याचा घाट लोकांनी घातला होता. किल्लारीच्या लोकांनी माझ्यासमोर हा प्रश्न मांडला होता. तर बेलकुंडचा मारुती महाराज साखर कारखाना सात वर्षे बंद ठेवून भंगार करत विकण्याचा डाव रचला गेला होता असा दावा त्यांनी केला. नेत्यांनी साथ दिल्याने किल्लारी कारखाना पुन्हा जोमाने उभा राहिल्याचा आनंद मला वाटतो, असे त्यांनी सांगितले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.