सोलापूर : विधानसभा निवडणुकीमुळे उसाचा हंगाम लांबला आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असे चित्र माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात आहे. येथे दरवर्षीप्रमाणे आताच ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. सध्या या भागातील कांदा, मका, बाजरी पिके काढणीला आली आहेत. पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे पिकेही जोमात आहेत. एकास वेळी पिके काढणीला आल्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पडला होता. परंतु ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात आल्यामुळे व या ऊस टोळीतील मजूर या भागात मिळेल ते काम करून दैनंदिन खर्च भागवत असल्याचा फायदा शेतीकामाला झाला आहे. शेतकऱ्यांचा मजुरांचा प्रश्न मार्गी लागला असून टोळीतील मजुरांनाही काम मिळाल्याने त्यांचा दैनंदिन खर्चाचा प्रश्न मिटला आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आंध्रप्रदेश, गुजरात राज्यातील अनेक टोळ्या गेल्या २० ते २५ दिवसांपासून आल्या आहेत. प्रत्येक मजुराला शेती कामासाठी २०० ते २५० रुपये हजेरी मिळत आहे. काही मजूर एकरावर पीक काढणी, तोडणी करीत आहेत. ५ ते ६ हजार रुपयांत बाजरीची काढणी करून कणसे मोडून त्याचा ढीग लावतात. ४ ते ५ हजारात मका पीक काढून कणसे मोडणी, करून पेंड्या बांधून देत आहेत. सटाणा तालुक्यातील मजुरांना कांदा लागवड करण्याचा अनुभव असल्याने हे मजूर कांदा लागवड करून देत आहेत. गळीत हंगाम सुरू होईपर्यंत हाताला काम मिळाल्यामुळे मजुरांचाही दैनंदिन खर्च भागत आहे असे जळभावी येथील शेतकरी महादेव राऊत यांनी सांगितले. तर रेडे (ता. माळशिरस) येथील ट्रॅक्टर मालक आप्पा शेंडगे म्हणाले की, यावर्षी मजुरांना उचल दिली आणि लगेच त्यांना बरोबर आणले आहे. येथे त्यांना याठिकाणी शेतकऱ्यांचे काम मिळत आहे त्यामुळे त्यांचा खर्च भागात आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.