सांगली : डालमिया भारत शुगरच्या निनाईदेवी युनिटच्यावतीने चालू गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. कारखाना यंदाही उच्चांकी दर देणार आहे, अशी माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुंभार यांनी दिली. डालमिया भारत शुगरच्या निनाईदेवी (युनिट) कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभी ते बोलत होते. जयश्री कुंभार व संतोष कुंभार यांच्या हस्ते उसाची मोळी पूजन करून गव्हाणीत टाकण्यात आली.
संतोष कुंभार म्हणाले की, कारखाना कोणत्याही राजकीय दबावाशिवाय सुरू आहे. वजन काटा व दराबाबत डालमिया कारखान्याचे नाव अग्रेसर आहे. कारखान्याने शाश्वत शेतीवर भर दिला असून प्रत्येक शेतकऱ्याने या मार्गदर्शनाचा उपयोग करून घेऊन उत्पन्न वाढवावे. ग्राम परिवर्तन योजनेंतर्गत गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, शुद्ध पाण्याची सोय करून देणे, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पंप, कोंबड्यांच्या पिल्लांचे वाटप आदी उपक्रम राबवले जात आहेत. यावेळी प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज पाटील, सुवर्णा पाटील, महादेव जाधव प्रमुख उपस्थित होते. सुधीर पाटील यांनी स्वागत केले. रणधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती नायकवडी यांनी आभार मानले. कारखान्याचे किरण पाटील, महेश कवचाळे, दुर्गेश तोमर आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.