साखर उद्योगाच्या आर्थिक स्थिरतेसाठी किमान विक्री दर वाढवावा: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : साखरेचा सध्याचा उत्पादनखर्च प्रति किलो ४१.६६ रुपये आहे, तर साखरेचा किमान विक्रीदर प्रतिकिलो ३१ रुपये असा २०१८-१९ मध्ये निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर ऊस खरेदी दरात (FRP) पाचवेळा वाढ झाली, मात्र साखरेच्या किमान विक्रीच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे साखर उद्योग आर्थिक संत्कातातून मार्गक्रमण करत आहे. उद्योगाच्या आर्थिक स्थिरतेसाठी केंद्र सरकारने तत्काळ साखरेच्या किमान विक्रीच्या दरात वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.

महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सरकारने २०२४- २५ हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) प्रति टनाला ३४०० रुपये ऊस दर जाहीर केला असून, हे एक सकारात्मक पाऊल आहे. एफआरपी वाढवूनही इथेनॉलचे दर वाढविण्यास होणाऱ्या विलंबाने साखर उद्योगास मोठा फटका बसला आहे. यंदाच्या हंगामात अपेक्षित असणारे विक्रमी साखर उत्पादन या सर्व बाबींमुळे साखर उद्योगातील आर्थिक प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत.

हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा साठा ८० लाख मेट्रिक टन असून, हंगामात ३२५ लाख मेट्रिक टन साखरेचे निव्वळ उत्पादन होईल, असा अंदाज आहे. यात इथेनॉलसाठी वळविण्यात येणाऱ्या साखरेचा अंतर्भाव नाही. देशांतर्गत घरगुती वापरासाठी २९० लाख मेट्रिक टन साखर लागेल, अशा स्थितीत देशातील ५३५ कारखान्यांच्या गोदामात अंदाजे ११५ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहते. त्यापैकी ५५ लाख मेट्रिक टन साखर हंगामाअखेर शिलकीचे मानली जाते.

बी-हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसातून इथेनॉल उत्पादन करण्यासाठी इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्यात यावी, तसेच साखर क्षेत्रातून इथेनॉलचे जास्त वाटप करण्यात यावे, अशीही मागणी महासंघाने केंद्राकडे केली आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ हे इथेनॉल मिश्रण कार्यक्रमासाठी निर्णायक आहे. कारण यावर्षी २० टक्के मिश्रणाचे लक्ष्य गाठायचे आहे. आपली इथेनॉलची गरज ९४० कोटी लिटर्सची आहे. त्यापैकी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी ८३७ कोटी लिटर्सचे वाटप केले आहे. त्यातील ३७ टक्के म्हणजे ३१७ कोटी लिटर्सइतका वाटा साखर उद्योगाचा आहे. ज्यामध्ये अंदाजे ४० लाख मेट्रिक टन साखरेचा वापर होणार आहे. साखर उद्योगाचे योगदान इथेनॉल मिश्रण कार्यक्रम उद्दिष्टांमध्ये कायम ठेवण्यासाठी उसाचा रस / सिरप आणि बी-हेवी मोर्लेसिसपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या किमती सुधारित करून त्या अनुक्रमे प्रतिलिटरला ७३.१४ रुपये आणि ६७.७० रुपये अशा कराव्यात, अशीही मागणी साखर महासंघाने केली आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here