सांगली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना सांगितले की, पवारांच्या कार्यकाळात सहकारी साखर कारखान्यांची संख्या २०० वरून १०१ वर आली. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, पवारांच्या कार्यकाळात इतक्या मोठ्या संख्येने सहकारी साखर कारखाने का बंद पडले, सहकारी साखर कारखानदारीचा का ऱ्हास झाला, हे विचारण्यासाठी आज मी आलो आहे. शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर कारखान्यांवरील आयकर हटवला, तसेच कृषी कल्याणासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
यावेळी शाह यांनी विविध विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला 10,15,900 कोटी रुपयांच्या वाटपासह मोदी प्रशासनाच्या महत्त्वाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. वडवण येथे आशियातील सर्वात मोठे बंदर आणि सांगली येथे नवीन विमानतळ उभारणीचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. या भागातील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि दोन वंदे भारत गाड्या सुरू करण्याचाही त्यांनी उल्लेख केला. हळद मंडळाची स्थापना करण्यात आली असून सांगलीत शाखा उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत महायुतीच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.