बेळगाव : उत्तर कर्नाटकातील सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यास शुक्रवारी, ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. उत्तर कर्नाटकातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याबाबतचा आदेश आधी शासनाने काढला होता; पण त्या आदेशात बदल केला आहे. आता एक आठवडा आधीच गळीत हंगाम सुरू होईल. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू होणार आहेत. यातून कर्नाटकमधील कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, याचा फटका सीमाभागातील, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. या भागातील उसाची पळवापळवी होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे ऊसतोडणी कामगार उत्तर कर्नाटकात दाखल होण्यास विलंब होऊ शकतो. त्याचा फटका काही साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे. कामगारांच्या समस्येमुळे काही कारखान्यांचे गाळप सुरू होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. दक्षिण व उत्तर कर्नाटकातील गळीत हंगामासाठी वेगवेगळी तारीख शासनाकडून निश्चित केली जाते. यंदाही सात ऑगस्ट रोजी झालेली बैठक व १३ ऑगस्ट रोजी साखर आयुक्तांनी दिलेल्या पत्राच्या आधारे उत्तर कर्नाटकातील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत साखर उद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले की, राज्यात ८० साखर कारखाने कार्यरत असून, सुमारे ७.५ लाख हेक्टर क्षेत्रात उसाचे पीक घेतले जाते. यावेळी उसासाठी प्रतिटन ३,४०० रुपये प्रस्तावित आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.