कोल्हापूर : कर्नाटकमध्ये यंदाच्या २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगामाला शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातून ऊस परराज्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाल्याने कारखान्यांवर ऊसतोड मजूर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या तारखेत बदल करून हंगाम लांबल्यास उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने साखर कारखाने कात्रीत सापडले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. ऊसतोडणी मजुरांचे मतदान होण्यासाठी ऊस गाळपाची तारीख बदलण्याची मागणी काही जणांकडून पुढे आली आहे. त्याला राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) तत्काळ विरोध दर्शविला आणि साखर उद्योगाच्या अडचणीही साखर आयुक्तांकडे मांडल्या आहेत. आता त्यावर मंत्रालय स्तरावरून साखर आयुक्तालयाने पाठविलेला प्रस्ताव पुढे निवडणूक आयोगाकडे पाठविल्याचे समजते. त्यावर येत्या आठवड्यात निर्णय जाहीर होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, पूर्वघोषित तारखेनुसार १५ नोव्हेंबरपासून राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यास तो सुरळीत सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. अन्यथा, शेजारील कर्नाटकात ऊस जाण्यामुळे राज्यातील ऊस उपलब्धता घटून कारखान्यांचा हंगाम कालावधी कमी होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त होत आहे. तसेच दुसरीकडे ऊस गुऱ्हाळे, गूळ पावडर उत्पादनासाठीही ऊसतोड सुरू आहे.