पुणे : पुणे जिल्ह्यात बारा सहकारी तर सहा खासगी साखर कारखाने आहेत. आर्थिक सत्ता असलेल्या कारखानदारांना आमदारकी, जिल्हा बँक, जिल्हा परिषदेचाही मोह सुटलेला नाही. खेड आळंदी आणि मावळ मतदारसंघ वगळता उर्वरित आठही मतदारसंघात कारखान्याशी संबंधित अकरा उमेदवार आहेत. साखर पट्ट्याचा हस्तक्षेप निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. आमदारकीच्या राजकारणाने जिल्ह्यातील साखर पट्टा ढवळून निघाला आहे. साखर कारखान्यांचे विद्यमान तीन अध्यक्ष तर माजी सहा अध्यक्ष प्रत्यक्ष विधानसभेच्या रणांगणातच उतरले आहेत.
बारामती मतदारसंघात सोमेश्वर, माळेगाव या उच्चांकी भाव देणाऱ्या कारखान्याचे नेतृत्व अजित पवार आणि शरयू अॅग्रो कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. आंबेगाव मतदारसंघात भीमाशंकरचे दोन माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व देवदत्त निकम यांच्यातील राजकीय संघर्ष टिपेला पोचला आहे. दौंड तालुक्यातही आमदार राहुल कुल व रमेश थोरात या भीमा पाटसशी संबंधित नेत्यांमध्येच सत्तासंघर्ष आहे. शिरूर-हवेली मतदारसंघात आमदार अशोक पवार है घोडगंगाचे माजी अध्यक्ष असून त्यांची ज्ञानेश्वर कटके यांच्याशी रंगतदार लढत होत आहे. जुन्नर मतदारसंघातही आमदार अतुल बेनके यांच्याशी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर भिडले आहेत. भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात ‘राजगड’चे अध्यक्ष व आमदार संग्राम थोपटे यांना शंकर मांडेकर, कुलदीप कोंडे आदींचे आव्हान आहे. इंदापूरमध्ये कर्मयोगीचे अध्यक्ष व नीरा-भीमाचे संस्थापक हर्षवर्धन पाटील विरुद्ध ‘छत्रपती’चे माजी अध्यक्ष दत्तात्रेय भरणे या दोन माजी मंत्र्यांच्या लढतीचे भवितव्य साखरपट्टाच ठरविणार आहे.