पिलीभीत : उत्तर प्रदेशमध्ये ऊस गाळप हंगाम सुरू झाला असून, सरकारने ऊस विभागाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी पीडब्ल्यूडीवर सोपवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गौरवकुमार गुप्ता यांनी रविवारी रस्त्यांची पाहणी केली. ऊस वाहतुकीस अडचण येऊ नये, यासाठी पीडब्ल्यूडी लवकरच रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू करणार आहे.
नौगवान संतोष ते घुरीखास या गावाकडे जाणारा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता, रामशाळा ते आझमपूर बारखेडा हा दीड किलोमीटर लांबीचा रस्ता, नगर ते चौसरा गावापर्यंत जाणारा एक किलोमीटर लांबीचा रस्ता, चौसरा गाव ते भासुंदा हा एक किलोमीटर लांबीचा आणि बिसलपूर देवरिया रोड ते घुरी खास गावापर्यंतचा आठशे मीटर लांबीचा रस्ता ही कामे पीडब्ल्यूडीला देण्यात आली आहेत. आतापर्यंत हे रस्ते ऊस विभागाकडे होते. बजेटअभावी व इतर कारणांमुळे रस्ते खराब होऊनही ऊस विभागाकडून यांची दुरुस्ती केली जात नाही. या खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. याच अनुषंगाने रविवारी कनिष्ठ अभियंत्यांनी या रस्त्यांची जागेवर पाहणी केली.