अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील व स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांच्या आदर्शातून जुन्या कार्यकर्त्यांनी सहकाराचा पाया मजबूत केल्याने पद्मश्री डॉ. विखे साखर कारखान्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. कारखान्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विक्रमी गाळप करा. विक्रमी भाव देण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करील. कारखान्याने ७५ वर्षांच्या वाटचालीत अनेक चढ उतार पाहिले, मात्र सभासदांचा विश्वास, कामगारांचे सहकार्य व सहकाराच्या बांधिलकीतून डॉ. विखे कारखान्याने उंच भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखानाच्या अमृत महोत्सवी ऊस गळीत हंगाम थाटात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. येत्या काळात एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्ह्यात डॉ. विखे कारखान्याने प्रथम क्रमांकाचा भाव दिल्याचे विखे-पाटील यांनी आवर्जून सांगितले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के- पाटील होते. राज्याचे माजी सचिव आबासाहेब जन्हाड, शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब भोसले, रंगनाथ उंबरकर, नानाभाऊ म्हसे, श्रीराम आसावा, अब्दुल शेख व रावसाहेब लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रवरा बँकेचे चेअरमन भास्कर खर्डे, व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, अण्णासाहेब कडू, चेअरमन नंदू राठी, सुनील जाधव, चेअरमन गिता थेटे, शांतीनाथ आहेर, कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हाईस चेअरमन सतीश ससाणे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आदींसह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.