अहिल्यानगर : गणेश कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा, या हेतूने आपण तो चालवायला घेतला होता. आम्ही पुढाकार घेतला नसता, तर त्याचा लिलाव झाला असता. सभासद वाढविले असते, तर तो आमच्याच ताब्यात राहिला असता, हे विसरू नका. गणेश कारखाना बंद होता, त्यावेळी तो चालविण्यासाठी विरोधक का पुढे आले नाहीत ? असा सवाल महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला. एकरुखे व रांजणगाव खुर्द येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. आपल्या शेजारचे नेते आपल्या भागात येऊन संभ्रम निर्माण करतात असे ते म्हणाले.
विखे-पाटील म्हणाले की, विरोधक आमच्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करतात. मात्र, विकासाच्या मुद्द्यावर विरोधक का गप्प राहतात. आम्ही चालवला म्हणून गणेश कारखाना टिकून राहिला आहे. शिर्डी येथील नियोजित औद्योगिक वसाहतीमुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोठी रोजगारनिर्मिती होईल. निळवंडे कालव्याचे काम पूर्ण झाले. वितरिकांच्या कामासाठी केंद्र सरकारने आठशे कोटी रुपये मंजूर केलेत. पालकमंत्री या नात्याने संगमनेर तालुक्यासाठी आपण राजकारणाआड येऊ न देता निधी दिला.