बेळगाव: जिल्ह्यातील निपाणी, चिकोडी तालुक्यात ऊसतोड सुरू झाली आहे. निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून कारखान्याची तोडणी यंत्रणा कार्यरत झाल्याने कारखाना परिसर गजबजून गेला आहे. यंदा कारखान्याने दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, यासाठी तोडणी वाहतूक यंत्रणा नियोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी ऊसतोड यंत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसतोडीसाठी प्राधान्यक्रम दिला जात आहे. जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप ऊस दराची घोषणा केलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत ३,७०० रुपये पहिला हप्ता देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका असल्याने सारेच नेते निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यामुळे तेथील कारखान्यांचा गळीत हंगाम निवडणुकीच्या निकालानंतरच सुरू होणार आहे. तोपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील मल्टीस्टेट कारखान्यांनी नजीकच्या महाराष्ट्र हद्दीतील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील ऊसतोड गतीने सुरू केली आहे.
यंदा कारखान्यांनी गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंबर कसली आहे. तोडणी मजुरांची घटलेली संख्या लक्षात घेऊन ऊस तोडणी यंत्रे कारखान्यांनी उपलब्ध केली आहेत.उसाची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे. याचा परिणाम म्हणून सर्वच साखर कारखान्यांना यंदा ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार आहे.