धाराशिव : नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रात मागील हंगामात लागवड केलेल्या व खोडवा, ऊस सभासद व बिगर सभासद यांची सात हजार हेक्टर उसाची नोंद कारखान्याकडे झालेली आहे. किमान सात ते साडेसात लाख टन ऊस गाळपासाठी यावर्षी काही प्रमाणात गेटकेन मधूनही ऊस गाळपास घ्यावा लागेल. त्यामुळे नॅचरल उद्योग समूह यावर्षी गळीत हंगामात सात लाख टन उसाचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी केले. नॅचरलच्या २३ व्या गाळप हंगाम प्रारंभ बुधवारी (ता. १३) गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी ठोंबरे बोलत होते.
यावेळी अध्यक्ष ठोंबरे म्हणाले, की नॅचरल शुगर यावर्षी प्रतिदिन एक कोटी ७५ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन करणार आहे. त्यासाठी लागणारे बी हेवी मॉलेसिसचे जास्तीत जास्त उत्पादन घेणार आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी होऊन, जास्त दैनंदिन गाळप यंदाही होणार आहे. नॅचरल शुगरने ऊस लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. त्याचा परिणाम म्हणून कार्यक्षेत्रामध्ये उसाचे क्षेत्र चांगले दिसून येत आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवून प्रतिदिन ७५०० टन केली आहे. नॅचरल शुगरला गेल्या हंगामात जास्त ऊस पुरवठा करणारे राकेश माकोडे व नूतन माकोडे या दांपत्याच्या हस्ते विधीवत पूजन करून गळीत हंगाम प्रारंभ करण्यात आला. संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी प्रास्ताविक केले. एन. साई मल्टीस्टेट बँकेचे उपाध्यक्ष किशोर डाळे यांनी आभार मानले.