पूर्णा : बळीराजा साखर कारखान्याने २०२४- २५ च्या गळीत हंगामात कारखान्याने ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने गेल्या गळीत हंगामात ६,१२,६६३ मे.टन ऊसाचे गाळप करून ७,१५,८५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेले आहे. ११.८९ टक्के साखर उतारा मिळवला. निव्वळ देय एफआरपी प्रति टन २,८०४.८४ रुपये अंतिम झाला. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली असून कारखाना प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ण केले. गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ऊस उत्पादक, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केले.
कारखान्याचा ११ वा गळीत हंगामाचे मोळीपूजन व बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. बुधवारी चेअरमन शिवाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक दिनकरराव जाधव व त्यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रशासनाने यंदा २५०० रुपयांचा पहिला हप्ता आणि नंतर समान दोन हप्त्यात उर्वरीत एफआरपी दिली जाईल अशी घोषणा केली. कार्यक्रमास जनरल मॅनेजर भगवान मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चिफ केमिस्ट किरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रिक मॅनेजर नितीन गणोरकर, ऊस पुरवठा अधिकारी विनायक कऱ्हाळे, रामजी शिंदे, बालासाहेब तिडके, सुरक्षा अधिकारी विनायक कदम, टाईम किपर गणेश सूर्यवंशी, महेश हेबळे उपस्थित होते.