नाशिक : रावळगाव साखर कारखान्याच्यावतीने प्रथमच महिलांच्या हस्ते गळित हंगामाचा प्रारंभ करण्यात झाला. देशातील खासगी क्षेत्रातील रावळगाव हा पहिला साखर कारखाना आहे. त्याच्या गळीत हंगाम प्रारंभावेळी नगरसूल आश्रमाचे नवनाथबाबा प्रमुख उपस्थित होते. २१ ऊस उत्पादक महिलांच्या हस्ते गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन महिलांनीच केले. गेल्या वर्षी प्रायोगिक हंगामात सव्वा लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर्षी वेगळी वाट स्वीकारत महिलांच्या हस्ते हंगामाचा प्रारंभ केला.
रावळगाव कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड म्हणाले की, कारखाना ऊस लागवडीसाठी बेणे तसेच चांगला दर देईन. यावर्षी उच्चांकी ऊस गाळपाचा मानस आहे. येत्या वर्षात बायोप्रॉडक्ट सुरू केले जातील. गावातील २५० ते ३०० तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कारखाना परिसरात ऊस लागवड वाढवावी. जेणेकरून ऊसतोड व वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल. यावेळी पूजा कराड (निफाड), वंदना गायकवाड यांची भाषणे झाली. अध्यक्ष गायकवाड रावळगावला गतवैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास नवनाथबाबा यांनी व्यक्त केला. संचालक प्रवर्तक मंडळ कुटुंबांच्या हस्ते ऊस उत्पादक महिलांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊ सन्मान करण्यात आला. स्नेहल दगडे यांनी प्रास्ताविक केले. स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कावेरी टिळेकर यांनी आभार मानले.