सांगली : जिल्ह्यात पाच कारखान्यांकडून गाळप सुरू, आठवडाभरात हंगामाला येणार गती

सांगली : जिल्ह्यातील श्री दत्त इंडिया (वसंतदादा कारखाना) सांगली, मोहनराव शिंदे कारखाना (आरग), श्रीपतराव कदम ( डफळापूर). क्रांतिअग्रणी (कुंडल), यशवंत सहकारी साखर कारखाना (नागेवाडी) या पाच कारखान्यांकडून बुधवार, गुरुवारपासून गळीत हंगाम सुरू झाला आहे. उर्वरित कारखान्यांचा हंगाम आठवडाभरात सुरू होईल, असा अंदाज आहे. तर कर्नाटकातील सीमाभागातील कारखाने आठ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सध्याच उसाला तुरे आले आहेत. तुरे आल्यामुळे उसाच्या वजनात घट होते. उसाच्या लागणी तोडल्याशिवाय खोडवा पीक गाळपास नेले जात नाही. परिणामी यंदा वजनात घटीसह खोडवा पीक काढून दुबार पिकेही घेता येणार नाहीत. याचाही शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कारखान्यांची धुराडी पेटत आहेत. यंदाचा हंगाम आधीच १५ दिवस उशिरा सुरू होत आहे. साखर आयुक्तालयाकडे राज्यातील २०४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप परवाना मागितला होता. आतापर्यंत त्यापैकी शंभरहून अधिक कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला. राज्यात उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे आणि दिवाळीचे कारण सांगत १ ऐवजी १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला होता. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीमुळे मजूर ऊसतोडणीसाठी बाहेरगावी जात असल्याने त्यांच्या मदतानाचा विचार करून राज्य सरकारने १५ तारखेऐवजी मतदान झाल्यानंतर गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी केली. मात्र, निवडणूक आयोगाने याचा विचार न केल्याने साखर आयुक्तालयाने गुरुवारपासून ऑनलाइन ऊस गाळप परवाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here